विकासकामांच्या वाटपात सुबे अभियंत्यांवर अन्याय 

अभियंत्यांकडून नाराजी व्यक्त; प्रशासनाकडून बोळवण 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील विकास कामांच्या वाटपात न्याय न मिळाल्याने उपस्थित सुशिक्षित बेरोजगारांनी उपस्थित अधिकार्‍यांकडे नाराजी व्यक्त केली. काहीतरी हाताला काम मिळावे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे बांधकामाची छोटी-मोठी कामे दिली जातात. काही इच्छुकांच्या हाताला तर एकही काम लागत नाही. यावर अधिकार्‍यांनी संबंधितांचा भविष्यात विचार केला जाईल असे सांगून बोळवण करण्यात आली.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी बुधवारी (ता. 9) काम वाटप प्रक्रिया झाली. जिल्ह्यातील सुमारे नऊशेहून अधिक नोंदणीकृत बेरोजगार उपस्थित होते. जिल्हापरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नऊ तालुक्यातील सुमारे शेकडो बेरोजगार या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यात कामे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. त्यामुळे सुरूवातीपासूनच गोंधळ निर्माण झाला होता. चिपळूण तालुक्यात कामे वाटपावरून तु तु मै मै झाली. सुमारे दोन तास हा वाद सुरू होता. पन्नास टक्के जुन्या बेरोजगारांना आणि पन्नास टक्के नवीन बेरोजगारांना कामे वाटप करण्याच्या सूत्रावरून गोंधळ झाला. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. मंडणगडपासून ते राजापूरपर्यंत सर्व तालुक्यातील बेरोजगार सकाळपासून जिल्हा परिषद भवनात ठाण मांडून बसले होते. अनेकांच्या पदरी निराशाच पडली. काम न मिळताच हे बेरोजगार रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. मुळात जी कामे होती ती यापूर्वीच राजकीय पुढारी व ठेकेदार यांनी घेतली होती, अशी चर्चा सुरू होती. याबाबत काही तरुण मंडळींनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इ. इ. मटपथी यांच्याकडे विचारणा केली. आम्हाला केव्हा न्याय दिला जाणार असा प्रश्‍नही उपस्थित केला. काही कामे ज्येष्ठतेनुसार निवडली जातात, तर काहीवेळा त्यात यादीचा विचार केला जात नाही. त्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणांनाही कामे द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी अधिकार्‍यांनी याबाबत विचारविनिमय करुन पुढील बैठकीवेळी कामे देण्यात येतील असे आश्‍वासनही दिले. याप्रसंगी अनेकांना काम न मिळाल्यामुळे रिकाम्या हाताने माघारी जावे लागले. दर तिन महिन्यांनी अशा बैठक घेऊन कामे वाटप करणे अपेक्षित असतानाही त्यावर अंमलबजावणी झाली नसल्याची व्यथा उपस्थितांकडून अधिकार्‍यांपुढे मांडण्यात आली.