रत्नागिरी:- कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक परप्रांतीय मजूर रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर श्रमिक ट्रेनने त्यांना पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे 1440 मजूर श्रमिक ट्रेनने गुरुवारी रवाना झाले.
विविध कामांसाठी जिल्ह्यात दाखल झालेले झारखंड येथील अनेक मजूर लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. सध्या कामे थांबल्यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध नव्हता. या परिस्थिती त्यांची गैरसोय होत होती. लॉकडाऊन वाढत जात असल्याने अखेर अशा लोकांना गावी जाता यावे यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही ट्रेन आज रवाना होणार होती. परराज्यात जाणार्यांची नोंदणी जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली होती. त्यानुसार झारखंडला जाण्यासाठी 1440 मजुरांनी नोंदणी केली होती. रत्नागिरीतून जाणार्या लोकांना छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर एकत्रित ठेवण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी ट्रेन येणार असल्यामुळे त्यांना सायंकाळी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एसटीतून नेण्यात आले. स्थानकावर त्यांना उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था केली गेली होती. ठिकठिकाणी त्यांची मेडीकल तपासणीही केली गेली आहे. झारखंडला जाणार्यांमध्ये खेड तालुका 300, चिपळूण 244, गुहागर 144, रत्नागिरी 508, लांजा 73, राजापूर 58, संगमेश्वर 97 अशा 1440 मजूर आहेत.