जीवनोन्नती अभियानातून रत्नागिरीतील बचतगटांना 13 कोटी 42 लाखांचे कर्ज वाटप

रत्नागिरी:- बचत गट चळवळीला हातभार लावण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत जानेवारी अखेरीस ४८२ गटांना १३ कोटी ४२ लाख ८४ हजार ६३१ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.

जीवनोन्नती अभियानात २०२१-२२ या आर्थिक वर्षात सीआरपी आणि बुक किपरची ३५ प्रशिक्षण घेण्याचे लक्ष्य होते. जानेवारी २०२२ अखेर प्रत्यक्षात ३८ प्रशिक्षणं घेण्यात आली आहेत. बँक मेळाव्यांतर्गत हॉटेल विवेक येथे उपक्रम राबविण्यात आला होता. मेळाव्यात १६ गट उपस्थित होते. त्यांची कर्ज प्रकरणेही तयार केली गेली. स्वयंसहाय्यता समुहाचे दससुत्री प्रशिक्षणेही झाली. बँकर्स प्रशिक्षण, स्वयंसहाय्यता गट स्थापना आणि प्रथम, व्दितीय मुल्यांकन केलेल्या गटांतर्गत सहा नवीन स्वयंसहाय्यता गट स्थापन केले. जानेवारी अखेरीस ४८२ गटांना १३ कोटी ४२ लाख ८४ हजार ६३१ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. भाजीपाला लागवडीसह विविध व्यावसाय करण्यासाठी महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जातात. त्यासाठी उमेद अभियानातून पावले उचण्यात येतात. हे कर्ज देण्यापुर्वी आवश्यक प्रस्ताव सादर करणे गरजेचे असते. कर्जाचे वितरण, व्यावसायासाठी लागणारे प्रशिक्षण आणि मार्केटींग या बाबींसाठी महिलांना प्रशिक्षणही दिले जाते.