गटाराच्या कामासाठी खालची आळीतील नागरिक आक्रमक 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील खालची आळी ते मांडवी परिसरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटाराचे काम पालिकेने वेळीच पूर्ण केले नाही. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर साचून राहते आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते. मुख्याधिकार्‍यांनी वेळीच घटनास्थळी पोचून प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

खालची आळी व मांडवी परिसरातील मुख्य रस्त्याजवळ लोकवस्तीमधून सांडपाणी वाहून नेणारे गटार आहे. त्या गटारामधून सांडपाण्याचा निचरा होतो. गटारातील सांडपाणी वहाळातून समुद्राला जाऊन मिळते. परंतु मांडवीमधील वहाळात प्रचंड प्रमाणात समुद्राची वाळू व गाळ साचल्याने वहाळामधून सांडपाण्याचा निचरा होत नाही. पाणी तुंबून ते रस्त्यावर येते. त्याचा त्रास मांडवी व आजुबाजूचे परिसरातील रहिवाशांना होतो. या सांडपाण्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तोंडी, लेखी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केले आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. सद्यःपरिस्थितीत गटार पूर्णपणे भरले असून सांडपाण्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. हा त्रास वारंवार होत असल्यामुळे नाराज नागरीक रस्त्यावर उतरले होते. हा प्रश्‍न समजल्यानंतर माजी नगराध्यक्ष राहूल पंडित घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी सांडपाण्याचा प्रश्‍न मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्यापुढे मांडला. त्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. येथील नागरिक तुषार कांबळे, निखिल लांजेकर, ॠषिकेश करंडे अभिजित आगे्र, नितीन कांबळे आदींनी परिस्थिची माहिती मुख्याधिकार्‍यांना दिली. तसेच या समस्येसंदर्भात पालिकेसह जिल्हाप्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्यानुसार यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली. मुख्याधिकार्‍यांनी याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात नागरिकांना आश्‍वासन दिले.

दरम्यान, येथील गटाराच्या कामाचा 1 कोटी 45 लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा प्रस्ताव निधी मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.