काजू बहरला, पण हापूस मोहर मात्र काळवंडला

बागायतदारांमध्ये थोडी खुशी, थोडा गम 

रत्नागिरी:- फळांचा राजा हापूस आंबा अद्यापही फवारणीच्या चक्रातच अडकला आहे तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांच्या मालिकांचा सामना करीत जिल्ह्यात काजूला बहर आल्याने हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक भागातील काजू बागांमध्ये लाल, पिवळी टपोरी काजू बोंडेे दिसू लागली आहेत. त्यामुळे बागायतदारांचे काजू बी गोळा करण्यासाठी नियोजन सुरू  झाले आहे.

लांबलेला मोसमी पाऊस त्यानतंर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असलेला अवकाळी पाऊस, त्या नंतर जानेवारीतही अवकाळीने पुरविलेला पिच्छा आणि त्या नंतरही असलेले ढगाळ वातावरण अशा प्रतिकूल वातावरणीय नैसर्गिक संकटांनी जिल्ह्यातील बागायती क्षेत्र संकटात होते.  या संकटाचा सामना करताना बागायतदारांनी कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवारण्यांचे वेळापत्रकही बदलले.  तसेच अवकाळी पावसाच्या मालिकेने फवारणीचा अतिरिक्त खर्चही करावा लागला. बदललेल्या वातावरणात गारठ्याचे प्रमाणही कमी झाल्याने अद्यापही काही भगात फवारण्यांचे सत्र सुरूच  आहे.  मात्र काटेकोर व्यवस्थापन केलेल्या काजू बागायतदारांच्या बागांमध्ये आता काजू झाडांना लाल, पिवळ्या रंगाचे बोंडे लगडलेली पहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या काही भागांत काजू हंगामाला सुरुवात झाली आहे.

काजू हंगाम सुरू झाल्यामुळे काजू बागायतदारांचीही काजू बी गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे. काजू दर गेल्या वर्षी 110 ते 150 पर्यंत होता. या वर्षी काजू बी दर अजूनही निश्तिच झालेला नाही. आंबा हंगामाच्या आधीच काजू हंगामाला सुरवात झाल्याने दर मिळण्याची शक्यता बागायतदरांनी व्यक्त केली आहे.