रत्नागिरी:- चिपळूण आणि खेड तालुक्यातील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. यामुळे स्वामित्वधानाच्या ( रॉयल्टी) माध्यमातून शासनाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत मेरीटाईम बोर्ड आणि जिल्हा खनिकर्म विभाग पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे नियोजन करीत आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डी. एम. पाटील यांनी दिली.
शासनाने असा अनधिकृत वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला साधनसामग्री आणि अधिकाराच्यादृष्टीने सक्षम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात वाळू उपसाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला मोठा महसूल मिळतो. काही कोटीमध्ये हा महसूल जातो. त्यामुळे तो वाढावा यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जिल्ह्यात हातपाटी, ड्रेझरद्वारे वाळू उपसा केला जातो.
याबाबतचे सर्व्हेक्षण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड करत. त्यांच्या सर्व्हेक्षणानंतर खाडी, नद्यांमध्ये कोणत्या भागातील किती ब्रास वाळू उपसा करावा, याचा अहवाल जिल्हा खनिकर्म विभागाला दिला जातो. त्यानंतर रॉयल्टी भरून त्याचा लिलाव करून घेतला जातो.
वाशिष्ठी खाडीत वाळू उपसा करण्यासाठी दोन गटांना खनिकर्म विभागाने परवानगी दिली आहे; परंतु या परवानग्यांच्या नावाखाली अनेक व्यावसायिकांनी अनधिकृत वाळू उपशाचा धुमाकूळ घातला आहे. नोंदणीकृत चार बोटींमार्फत वाळू उपसा करण्याची परवानगी आहे; मात्र शेकडो बेकायदेशीर बोटींनी वाळूची बेसुमार लूट सुरू आहे. याकडे संबंधित यंत्रणेने कानाडोळा केला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे शासनाची रॉयल्टी बुडत असून मोठे नुकसान सोसावे लागत आहे. चिपळूण परिसरातील वाळू व्यावसायिकांच्या बोटी खेड तालुक्याच्या हद्दीत जाऊन वाळू उपसा करीत आहेत.
वाळूच्या या बेसुमार आणि बेकायदेशीर उपशाला चाप घालण्यासाठी जिल्हा प्रशासन काय करणार याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, आमच्यापर्यंत हा विषय आला आहे. त्यानुसार जिल्हा खनिकर्म विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पोलिस अशी संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात वाळू व्यावसायिकांची यंत्रणा एवढी मजबूत आहे की, आम्ही जाण्यापूर्वीच त्यांना खबर लागते. निर्जन भागात हे वाळू डेपो आहेत. तिथे जाताना आम्हाला सुरक्षेचा विचार करावा लागतो; मात्र त्या दृष्टीने अजून आमचा विभाग तेवढा सक्षम नाही. त्यामुळे लवकरच संयुक्त कारवाई केली जाईल.