देवरुख:- देवरुख येथील प्रणय वणकुंद्रे यांनी व्यवसाय वृद्धी करिता पाच लाख रुपयांची मुदत ठेव देवरुख येथील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था देवरूख मध्ये ठेवली होती. मुदत संपल्यानंतर आपल्या मुदत ठेवीची रक्कम परत मिळावी यासाठी त्यांनी लेखी मागणी केली होती. यावेळी पतसंस्थेने रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर प्रणय वणकुंद्रे यांनी थेट जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली होती. याचा निकाल नुकताच लागला असून वणकुंद्रे यांना सदरील मुदत ठेवीची रक्कम व्याजासह आणि झालेल्या त्रासाच्या भरपाई सह देण्यात यावी असे आदेश आयोगाने दिले आहेत.
प्रणय वणकुंद्रे या तरुणानाने आपल्या व्यवसायातून मिळणारी रक्कम ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित देवरूख मध्ये दिनांक ३ सप्टेंबर २०१६ मध्ये पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवली होती. या ठेवीची मुदत २ मार्च २०१७ मध्ये संपणार होती. ही मुदत संपल्यानंतर श्री.वणकुंद्रे यांनी सदर पतसंस्थेकडे मुदत ठेवीची रक्कम मिळावी अशी मागणी ३० जुलै २०१८ रोजी लेखी अर्ज व्दारे केली होती.या अर्जाच्या प्रति जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी आणि सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालय देवरुख यांना देखील दिल्या होत्या. तक्रार अर्ज करून देखील पतसंस्थेने कोणतेही लेखी उत्तर दिले नाही. तसेच रक्कम देण्यास तरतूदही केली नाही आणि रक्कम देण्यास टाळाटाळ केली. ही रक्कम देण्याचे जाणीपूर्वक टाळले जात असल्याचे प्रणय वणकुंद्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्याला सदरील रक्कम व्यवसायाकरिता आवश्यक असल्याने कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग स्वीकारला. कायदेशीर मार्ग स्वीकारत ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी यांच्याकडे दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. दिलेल्या तक्रारीत आपल्या ठेवीची रक्कम व्याजासह आणि झालेल्या मानसिक शारीरिक तसेच व्यवसायातील आर्थिक नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये मिळावे असे म्हटले होते. या तक्रारीवर गेली दोन वर्ष युक्तिवाद सुरूच होता. मात्र तक्रारदार यांनी दिलेल्या भक्कम पुराव्यामुळे वणकुंद्रे यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
तक्रार निवारण आयोगाने या निकालामध्ये दिलेल्या आदेशात तक्रारदार वणकुंद्रे यांच्या ठेवीची रक्कम ४५ दिवसात सहा टक्के व्याजदराने व्याजासह देण्यात यावी. तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी देखील पंधरा हजार रुपये देण्यात यावेत असे म्हटले आहे. ४५ दिवसांत ५ लाख ९ हजार ८६३ रुपये एव्हड्या देय रक्कमेची पूर्तता पतसंस्थेने न केल्यास ग्राहक संरक्षण कायदा कलम ७१ व ७२ प्रमाणे पतसंस्थेच्या विरुद्ध दाद मागता येणार आहे असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी यांनी हा आदेश दिला आहे. याकामी तक्रारदार वणकुंद्रे यांची बाजू वकील अभिजित कदम यांनी मांडली.
गेल्या काही वर्षापूर्वी ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था देवरुख मधील अफरातफर उजेडात आली आणि या आर्थिक घोटाळ्याबद्दल शहरात एकच खळबळ उडाली होती.यामुळे ठेवीदारामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काहिंही ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती.मात्र या दरम्यान प्रणय वणकुंद्रे यांनी आपल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर आपली रक्कम मिळावी आणि रास्त मागणी केली होती.मात्र त्यांना त्यांची ठेव सहजपणे मिळू न शकल्यानेच आयोगाकडे तक्रार केली. आता वणकुंद्रे यांना ठेवीची रक्कम कधी मिळणार आणि पतसंस्था याबाबत काय निर्णय घेणार याकडे देवरुख वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या निर्णयामुळे अन्य ठेवीदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.