बागेतच लिलाव, मिळाला पंचवीस हजारांचा भाव

रत्नागिरी:- प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पावस (ता. रत्नागिरी) येथील बागेतून मुहूर्ताची पहिली पेटी विक्रीला काढण्यात आली. अमृता मँगोजने बागेतच घेतलेल्या लिलावात मुहूर्ताची सहा डझनची पेटी 25 हजार रुपयांना उरणचे आशुतोष काळे यांनी खरेदी केली.


पावस येथील आंबा बागेत अभिजित पाटील यांच्या अमृता मँगोजतर्फे ही लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. त्यात मुंबईसह इचलकरंजीमधील सहा व्यावसायिक सहभागी झाले होते. प्रक्रिया चालू करण्यापुर्वी पेटीचे पूजन श्री. पाटील यांच्या हस्ते केले. यावेळी अभिजित यांचे वडील, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, कर्नल आशुतोष काळे, उद्योजक नवीन राजपाल, बागायतदार सखाराम आग्रे, पराशर मोकल, रवींद्र कुलकर्णी, जयवंत कोळी यांच्यासह बागेचे व्यवस्थापक माजी कृषी अधिकारी संदिप डोंगर उपस्थित होते. शुक्रवारी (ता. 11) मुहूर्ताच्या बारा डझन आंबा विक्री केला. लिलावामध्ये पहिल्या सहा डझनच्या एका पेटीची मुळ रक्कम 18 हजार रुपये होती. लिलावात तिला 25 हजार रुपये शेवटची बोली लागली.

या प्रक्रियेबाबत अभिजित पाटील म्हणाले, कर्नाटकी आंबा भेसळ करत असल्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही. बाजार समितीमध्येही तीच स्थिती दिसते. त्यामुळे रत्नागिरी, देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी विविध कंपन्या, विक्रेते यांना बागेत आणण्यात येणार आहे. पावस येथील बागेत 1700 कलमे असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत वीस हजार पेटी आंबा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. तसेच भविष्यात बागांचे व्यवस्थापन करताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

पावस बागेचे उत्तम व्यवस्थापन संदिप डोंगरे यांनी केले. फेबु्रवारीच्या दुसर्‍या आठवड्यात हापूस बाजारात आणण्यासाठी गेले सहा महीने प्रयत्न करत होते. बिघडलेल्या वातावरणाचा मोहोर आणि कैरीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेत बाजारपेठेमध्ये हापूसची पेटी आणण्यात यश आले. डाग विरहीत आंबा अशी ओळख निर्माण करणार असून येत्या चार दिवसात अजून वीस पेटी विक्रीला बाजारात आणणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

टोरंटोत पाठवणार हापूस

सैन्यातून निवृत्त झालेले कर्नल आशुतोष काळे यांनी लिलावात विकत घेतलेली हापूसची पेटी टोरंटोमध्ये असलेल्या मुलीला पाठवणार असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी हापूस देशाच्या कानाकोपर्‍यात गेला आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर हापूसचा प्रचार होणे आवश्यक आहे.