लांजा येथून ठासणीच्या दोन बंदुकांसह एकाला अटक

 लांजा:- विनापरवाना ठासणीच्या दोन बंदुका वापरत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार लांजा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ७.३० वा. धडक कार्यवाही करत वनगुळे गुरववाडी येथील ४२ वर्षीय प्रौढाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , वनगुळे गुरववाडी येथील कृष्णा जगन्नाथ गुरव ( वय – ४२ ) याच्याकडे गैरकायदा , विनापरवाना ठासणीच्या दोन बंदुका ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती लांजा पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरिक्षण दादासाहेब घुटुकडे , पोलीस हेडकाँन्टेबल अरविंद कांबळे , भालचंद्र रेवणे , राजेंद्र कांबळे , नितीन पवार , नितेश राणे , महिला काँन्टेबल सुषमिता पटेकर , चालक पी . सी . खामकर आदींनी सोमवारी सायंकाळी ७.३० वा . दरम्याने वनगुळे गुरववाडी येथे जावून कृष्णा याच्या घराची झडती घेतली मात्र घरामध्ये काहीच आढळून आले नाही . त्यानंतर घरा शेजारी असलेल्या लाकडाच्या खोपीमध्ये लपवून ठेवलेल्या दोन ठासणीच्या बंदुका आढळून आल्या . त्याच्या समवेत बंदुकीला बार काढण्यासाठी वापरण्यात येणारी दारु , केप , छरे आदी साहित्या आढळून आले . सुमारे १४ हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले. 

  तालुक्यामध्ये गैरकायदा , विनापरवाना बंदुका वापरण्याचे प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे . मठ बंडबेवाडी येथील एका युवकांचा घाईगडबडीत बंदुक ओडत असताना बार होवून मृत्यू झाला होता . त्याच्याकडे बंदुक कुठून आली याचा शोध पोलीस घेत आहेत . सोमवारी लांजा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमध्ये कृष्णा गुरव यांच्याकडे दोन बंदुका आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . पोलिसांनी कृष्णा गुरव यांना ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील या करीत आहेत.