घरपट्टी भरा, अन्यथा जप्तीची कारवाई

रत्नागिरी पालिका ; ५ कोटी वसूल, २९ हजार इमलेधारक

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेपुढे घरपट्टी वसुलीचे मोठा आव्हान आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ११ कोटीची घरपट्टी वसुल करायची आहे. वसुली पथकाने शर्थिचे प्रयत्न करून आतापर्यंत पाच कोटी रुपये वसूल झाले आहेत. मात्र आता आर्थिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक असल्याने पालिका प्रशासनाने  नोटीसा काढुन घरपट्टी थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी पालिकेचे शहरातील २९,०८८ इमलेधारक आहेत. त्यांच्याकडुन सुमारे सहा कोटीच्या घरात घटपट्टी वसूल होते. मात्र गेल्या दोन वर्षे कोरोनाचे संकट होते. या काळाता लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार, उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. संचारबंदी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्याचा सर्वक्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला. यामध्ये रत्नागिरी पालिकेचाही समावेश आहे.
रत्नागिरी पालिकेच्या घरपट्टीवर याचा परिणाम झाला. त्यामुळे गेल्या वर्षी आणि या वर्षीची अशी एकुण ११ कोटीची घरपट्टी थकीत होती.

पालिकेच्या वसुली पथकाकडुन वसुलीसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र इमलेधारक घरपट्टी देण्यास चालढकल करीत आहेत. मार्च २०२२ पूर्वी ही वसुली होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने घरपट्टी थकविणाऱ्यांना नोटीस बजावून काही कालावधी दिला आहे. त्या दरम्यान जर घरपट्टी भरली नाही, तर संबंधिताचे इमले जप्त करण्यात येणार आहेत, असा इशारा वसूली पथकाने दिला आहे.