दुकान फोडून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

संगमेश्वर:- तालुक्यातील तुरळ येथे दुकान फोडून चोरट्याने २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       

संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद अरविंद शांताराम गुरव , राहणार तुरळ गुरववाडी यांनी दिली आहे. तुरळ येथे अरविंद गुरव यांचे अरविंद नावाचे पान स्टॉल आहे. गुरुवारी रात्री १०.३० वाजता गुरव हे पानस्टॉल बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा पान स्टॉल उघडण्यासाठी आले असता त्यांना दरवाजाची कडी काढालेली दिसून आली.     

आतमधे पाहणी केली असता मोबाइल व रोख रक्कम गायब असल्याचे गुरव यांना दिसून आले. याबाबत त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी व पंचनामा केला आहे. २ हजार रुपये किमतीचा मोबाईल व २३ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे गुरव यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.