रत्नागिरी:- शहराजवळच्या शिरगाव येथील श्रद्धा पेट्रोल पंप येथील मॅनेजरला 4 ते 5 जणांनी मारहाण केल्याची घटना 18 जानेवारी रोजी घडली. नीरज राजेंद्र मिश्रा (29, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.शिरगाव, रत्नागिरी ) असे मारहाण झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. अज्ञात 4 ते 5 जणांनी मारहाण केल्याची फिर्याद 21 जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघे जण दुचाकीवरून आले. त्यांनी कॅन मध्ये 50 लिटर डिझेल भरण्यासाठी आले होते. त्याप्रमाणे त्यांनी 4 हजार 800 रुपयांचे डिझेल भरून झाल्यानंतर आपल्याकडील एटीएम कार्ड नीरज यांना स्वाईप करण्यास सांगितले. यावेळी मॅनेजर नीरजने दुसऱ्या ठिकाणी असल्याचे सांगून दोघांना तिथे येण्यास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून त्या दोघांनी तसेच त्यांच्यासोबत इतर दोघांनी नीरज यांना शिवीगाळ करून लाकडी दांडका व केबलच्या वायरने मारहाण केली. नीरज यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम करत आहेत.