संजय शिंदे ; गडनदी धरणग्रस्त काळंबेवाडी पुनर्वसनाची पाहणी
रत्नागिरी:- काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भूखंड दुरुस्ती आणि रस्ते यासाठी आवश्यक असणाऱ्या संरक्षण भिंती बांधा तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने करून पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात धरण पाणलोट क्षेत्राच्या जवळ असणाऱ्या विस्थापित कुटुंबांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याच्या हालचाली करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काळंबेवाडी पुनर्वसन संदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यानी दिले.
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम धरण प्रकल्पबाधित काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भूखंड आणि इतर विषयाची बुधवारी (ता. १२) अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या उपाययोजना सुचवत पंधरा दिवसांत भूखंड ताब्यात देणार असल्याचे सांगितले. काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील ५६ कुटुंबांना भूखंड देय आहे. सद्यःस्थितीत या ठिकाणी “A” भूखंडावर २० भूखंड तर “B” भूखंडांवर १८ भूखंडे तयार करण्यात आल्याची माहिती या वेळी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता रणदिवे यांनी दिली. तर नागरी सुविधा कामांच्या निविदा झाल्या असून भूखंड सपाटीकरण काम पूर्ण झाल्यावर नागरी सुविधांची कामे सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी चंद्रकांत मोहिते, अपना बाजारचे संचालक अभिषेक सुर्वे, सचिन कदम, पोलिस पाटील शांताराम निकम आणि प्रकल्पग्रस्त आदी उपस्थित होते.
नदी गाळमुक्त करण्याची विनंती
अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पूरग्रस्त रातांबी गावातील गडनदीची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने उपाययोजना करून पावसाळ्यापूर्वी नदी गाळमुक्त करत अर्धवट राहिलेल्या संरक्षण भिंतीचे काम करावे, अशी विनंती उपसरपंच संतोष येडगे यांनी केली,त्यावर आपण स्थानिक आमदार शेखर निकम यांच्यासोबत बोलू आणि शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. शिंदे यांनी दिले.