जिल्ह्यातील 502 शेतकर्‍यांकडून 5935.75 क्विंटल भात खरेदी

रत्नागिरी:-जिल्ह्यात तयार होणारे भातपिक खरेदी विक्री संघाकडून खरेदी करण्यात येते. सोमवारी 11 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 502 शेतकर्‍यांकडून 5935.75 क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 केंद्रांवर भात खरेदी सुरू असून, गतवर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘खविसं’कडून सांगण्यात आले.

शेतकर्‍यांकडून शासन ठरवून देईल त्या दराने शेतमालाची खरेदी करून ती पुरवठा समितीकडे देणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे.  जिल्ह्यात या योजनेला शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन 2013-14 मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी 24 हजार 498.46 क्विंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने 1310 रुपये दर दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील 1959 शेतकर्‍यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती. हा भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती. गतवर्षी 1122 शेतकर्‍यांनी 13 हजार 295.05 क्विंटल भाताची विक्री केली होती. मार्केटिंग फेडरेशनने क्विंटलला 1750 रुपये दराने याची खरेदी केली होती. गतवर्षी शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 500 रुपये बोनसही दिला गेला. मात्र, हा बोनस 50 क्विंटलपर्यंतच मर्यादित होता.

रत्नागिरी जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत धान्याची खरेदी करण्यात येते. यासाठी जिल्ह्यात खेड तालुक्यात खेड, दापोली तालुक्यात दापोली आणि केळशी, गुहागर तालुक्यात गुहागर, रत्नागिरी तालुक्यात रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर, लांजा तालुक्यात लांजा, राजापूर तालुक्यात राजापूर आणि पाचल, चिपळूण तालुक्यात चिपळूण, मिरवणे, आकले, शिरगाव, शिरळ अशा 14 केंद्रांवर भाताची खरेदी करण्यात येते. ‘खविसं’ने  यंदाच्या वर्षी 22 हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन वर्षात शेतकरी भात विक्रीसाठी आणत असून, गत आठवड्यात 3 हजार 599 क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली.