रत्नागिरी:- सातत्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या रत्नागिरीला शनिवारी सायंकाळी आणखी एक मोठा धक्का बसला. मंडणगड तालुक्यात एकाचवेळी कोरोनाचे 11 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. 35 जणांचे अहवाल पाठवण्यात आले होते यापैकी 20 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी निम्म्याहून अधिक 11 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर खेडमध्येही 2 नवे रुग्ण सापडले आहेत. एकाचवेळी 13 कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचे अहवाल सातत्याने पॉझिटीव्ह येत आहेत. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने मोठी उसळी घेतली आहे. अशातच शनिवारी मंडणगड तालुक्यात एक दोन नाही तर तब्बल 11 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. हे सर्वजण मुंबईतून आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. यांचे रिपोर्ट शनिवारी आले असून यात 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार मंडणगड येथे 11 आणि कळंबणी अंतर्गत 2 अशा एकूण 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.मंडणगड येथे 11 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते या सर्व अकरा जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे यातील 9 जण पंदेरी या गावातील असून एक म्हाप्रळ व पालवणी एक आहे. कळंबणी अंतर्गत जे 2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांना लवेल येथे क्वारंटाइन खाली ठेवण्यात आले होते.या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 34 झाली आहे. त्यापैकी 5 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.