रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड खाडी किनारी भागात अनधिकृत बांधकाम जोरदार पद्धतीने सुरू आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत विना परवाना बांधकाम करण्याचा नवा पायंडा नव्या सत्ताधिकाऱ्यांच्या कालखंडात सुरू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. खाडी किनारी सीआरझेड नियम डावलत पाच नवी बांधकामे सुरू असून यातील 3 बांधकामे पूर्णत्वास पोहचली तरी स्थानिक ग्रामपंचायत याबाबत अंधारात आहे. राज्य शासनाच्या नियमांना बगल देऊन सुरू असलेल्या या बांधकाना स्थानिक ग्रामपंचायतीसह तहसीलदार प्रशासनाने देखील अभय दिल्याची चर्चा सुरू आहे.
पूर्णगड ग्रामपंचायतीच्या हद्दीत यापूर्वी देखील खाडी लगत भराव टाकून बांधकाम करण्यात आले होते. या विरोधात आवाज उठवल्यानंतर तहसील प्रशासनाने कारवाई केली होती. पूर्णगडचा समावेश सीआरझेड तीन मध्ये येत आहे. असे असताना देखील नियम, परवानगी डावलून येथील खाडी किनाऱ्यालगत पक्क्या घरांची बांधकामे सुरू आहेत. पूर्णगड ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबद्दल झाल्यानंतर अनधिकृत बांधकामांना पेव फुटल्याची चर्चा आहे. मात्र बांधकाम करताना सीआरझेड नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही बांधकामे करताना किनाऱ्या लगतच्या अनेक नारळाच्या आणि अन्य झाडांची कट्टल करण्यात आली आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
यापूर्वी येथीलच एका अनधिकृत बांधकामावर कारवाई केली असताना आता सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाना अभय का असा सवाल उपस्थित होत आहे. पूर्णगड खाडी किनारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामनमुळे पर्यावरण रक्षण कायदा-1986 चे उल्लंघन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यामुळे पूर्णगड खाडी किनारी उभ्या रहात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून प्रशासनाने गावातील सलोखा कायम ठेवावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.