रत्नागिरी:- परदेशातून चिपळूण तालुक्यात आलेल्या तिघांचे आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तिघांची ओमीओक्रॉन तपासणी होणार आहे. जनुकीय तपासणीसाठी नमुने दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठविण्यता आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
ओमीक्रॉनचे बाधित सापडू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणे सतर्क झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून परदेशातून आलेल्यांवर करडी नजर ठेवण्यात येत होती. विमानतळावर दाखल झालेल्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर त्या लोकांशी आरोग्य विभागाकडून संपर्क साधला जात आहे. त्यांची आठ दिवसानंतर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. कुवेतमधून चिपळूणात आलेल्या तिघांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांची पहिली चाचणी निगेटीव्ही आली होती. तिघांना घरीच क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. त्या तिघांना कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र त्यांचे नमुने ओमीक्रॉनच्या जनुकीय तपासणीसाठी दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. कुवेतमधून येताना ते तिघेही अटलांटामधील (कॅनडा) प्रवाशांच्या संपर्कात आल्याची माहिती पुढे आली आहे. जनुकीय चाचणीचे अहवाल सात दिवसात प्राप्त होणार असून तोपर्यंत त्या तिघांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती चिपळूण आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्या तिघांच्या संपर्कात आलेल्या सात जणांपैकी चौघांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. शनिवारी (ता. 1) 29 जण बाधित सापडले. त्यात सर्वाधिक चिपळूण तालुक्यातील 16 जणांचा समावेश आहे. दापोलीत 2, गुहागर 2, संगमेश्वर 1, रत्नागिरी 4, लांजा 2, राजापूर 2 जण आहेत. गेल्या तिन दिवसात बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सध्या 83 बाधित रुग्ण असून त्यातील 57 जण लक्षणे नसलेले आहेत. तर 26 जणांना लक्षणे आहेत. अतिदक्षता विभागात 4 तर ऑक्सीजन बेडवर 3 जणं उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा 79 हजार 228 असून त्यातील 76 हजार 654 बरे झाले आहेत. बरे होण्याचा टक्का 96.75 आहे. दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. मृत्यूदर 3.1 टक्के आहे.