रत्नागिरी:- शासकीय सुट्टीनंतर आलेली संकष्टी चतुर्थी आणि एसटी कर्मचार्यांचा बंद याचा परिणाम बुधवारी (ता. 22) गणपतीपुळेत दिसून आला. दिवसभरात सुमारे चार हजार भक्तांनी श्रींच्या दर्शनाला हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक वर्ग होता.
डिसेंबर महिन्यात अंगारकी चतुर्थी होती. त्यावेळी गणपतीपुळेत प्रचंड गर्दी झाली होती. आज संकष्टी चतुर्थीला प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. मंदिर व्यवस्थापनाकडूनही दर्शनासाठी मंडप उभारण्यात आला होता. आज दिवसभरात दर्शनासाठी येणार्यांची गर्दी नियंत्रणात होती. सध्या एसटी कर्मचार्यांचा बंद असल्यामुळे रत्नागिरी आगारातून एकही फेरी गेल्या सव्वा महिन्यात सुटलेली नाही. संकष्टीला दर्शनासाठी येणार्यांमध्ये खासगी वाहने घेऊन येणार्यांची संख्या अधिक होती. अनेक भक्तगण संकष्टीला फक्त दर्शनासाठी येतात. त्यात कोल्हापूर, सांगली, सातार्यासह सिंधुदुर्गतील लोकांचा समावेश असतो. सकाळी एसटीने गणपतीपुळेत येऊन ते सायंकाळी परतीला लागतात. त्यामुळे या वर्गाची कमी जाणवत होती. अनेक पर्यटक दर्शन घेऊन किनार्यावर फिरण्यासाठी जात होते. पुढील आठवड्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी किनारी भागात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यटनस्थळही सज्ज आहेत. मागील आठवड्यातील शनिवार, रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही पर्यटकांचा राबता अधिक होता. कोरोनामुळे पर्यटन व्यावसायाला उतरती कळा लागली होती. मंदिरे दर्शनासाठी चालु केल्यानंतर पर्यटन व्यावसायाला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. शासकीय सुट्ट्या, संकष्टी चतुर्थी यासह पुढे येणारा ख्रिसमस यामुळे व्यावसायिकांचे अर्थकारणाला चालना मिळत राहणार आहे.