मद्यपी कर्मचाऱ्यांना रनप दाखवणार घरचा रस्ता;
सर्वसाधारण सभेत निर्णय

दयामाया दाखवल्यास ठेकेदारावरही कारवाई

रत्नागिरी:- पाणी योजनेचे काम अपूर्णावस्थेत असल्याने शहरात पाणीप्रश्न निर्माण झालेला असताना पाणी विभागातील कर्मचारी मद्यपान करून कामावर येतात. दारूच्या नशेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाईनची चावी सोडणे, टाकीची लेव्हल झाली की नाही हे पाहण्याची शुद्धदेखील नसते. यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब असल्याची तक्रार नगरसेवक समीर तिवरेकर यांनी करताच नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धारेवर धरत मद्यपान करून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवा असे आदेश दिले. अशा कर्मचाऱ्यांना ठेकेदार पाठीशी घालत असेल तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका अशा स्पष्ट सूचना त्यांनी सभागृहात दिल्या. 

रत्नागिरी नगर परिषदेतील विद्यमान नगरसेवकांची अंतिम सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पडली. या बैठकीत पाणी योजनेच्या अपूर्ण कामावरून नगरसेवकांनी सभागृहात प्रश्नांची सरबत्ती लावली. अनेक भागात पाण्याची पाईप लाईन टाकून झालीय. केवळ चाचणी करून जोडण्या देणे बाकी आहे. मात्र जोडण्या न दिल्याने काढून ठेवलेल्या पाईपलाईन मधून आणि रस्त्यावर येत असल्याने दुचाकी स्लिप होऊन अपघात घडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा नगरसेवक मुन्ना चवंडे यांनी मांडला.  

तर झाडगाव भागात तीन दिवसांपासून पाणीच आले नसल्याची तक्रार नगरसेविका रसाळ यांनी केली. या मुद्द्याला धरून भाजप गटनेते समीर तिवरेकर यांनी पाणी विभागातील कर्मचारी मद्यपान करून कामावर येतात. रात्री त्यांना पाण्याची चावी सोडण्याची आणि टाकीची लेव्हल किती झालीय हे पाहण्याची देखील शुद्ध नसते अशी तक्रार केली. अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली तर अधिकारी म्हणतात दुसरा पर्याय नाही तर मग नगरसेवकांनी करायचे काय असे तीवरेकर म्हणाले. यावर नगराध्यक्ष साळवी यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक शब्दात समज देताना अशा कर्मचाऱ्यांना घरी बसवा त्यांचा पगार देऊ अशा स्पष्ट सूचना अधिकारी यांना केल्या. तसेच वेळेचं बंधन न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
 

नगर परिषद शाळा क्रमांक 2 लोकमान्य टिळक विद्यालयाची पुनर्बांधणी करण्याची मागणी नगरसेवक राजेश तोडणकर यांनी केली. ही शाळा धोकादायक असल्याने ती पडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्यापही ही शाळा पाडण्यात आलेली नाही. इमारतीचा स्लॅब पडत असून या धोकादायक इमारतीत दोन गाळे अजूनही सुरू आहेत. या गाळ्यांची मुदत संपुष्टात आली असूनही हे गाळेधारक गाळे का खाली करत नाहीत असा सवाल नगरसेवक तोडणकर यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गाळेधारक कोर्टात गेल्याने हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याची माहिती दिली. मात्र अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती नसल्याने नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी अधिकाऱ्यांनी अजेंडा वाचून आपल्या विषयाचा अभ्यास करूनच सभागृहात यावे अशी तंबी दिली.