संगमेश्वर:- संगमेश्वरातील माभळेकडून उजगावकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी संध्याकाळी 7 वा. च्या सुमारास विलास कानसरे आणि निलेश कानसरे उजगावकडे जात असताना जंगलात दडी मारून बसलेल्या बिबट्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या विलास कानसरेवर झेप घेतली.
बिबट्याने त्यांच्या पायाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीस्वार निलेशने न घाबरता दुचाकी पळविल्याने मागे बसलेल्या विलासचे प्राण वाचले. एवढंच नव्हे तर दुचाकीस्वाराचा बिबट्याने उजगाव गवळवाडी पर्यंत पाठलाग केला. मात्र याचवेळी ग्रामस्थांना पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली त्यामुळे दुचाकीस्वारांचे प्राण वाचले.
या परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . सायंकाळ नंतर ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास घाबरतात . त्यातच आता बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचा प्रकार घडल्याने गावात बिबट्याची दहशत आणखी वाढल्याने वन विभागाने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी उजगाव आणि माभळे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे .