एसटी बंद; सात दिवसात चार कोटींचे नुकसान

रत्नागिरी:- भर पावसातही एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सातव्या दिवशी चालू ठेवले आहे. रविवारी सकाळी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी शपथही घेतली. दरम्यान रविवारी दिवसभरात राजापूर आगारातून दोन फेऱ्या सोडण्यात आल्या. आतापर्यंत गेल्या सात दिवसांत रत्नागिरी एसटी विभागाचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. साडेचार हजारपैकी फक्त ६० कर्मचारी हजर झाले आहेत. परंतु वाहतूक सुरू झालेली नाही. काम बंद आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य शासन काय निर्णय घेते आणि वाहतूक कधी सुरू होते, याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी पुकारलेला बंद सलग सातव्या दिवशीही चालू होता. रविवारी सायंकाळी पडलेल्या पावसातही आंदोलनकर्ते कर्मचारी माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

शनिवारी (ता. १३) चिपळूण आगारातील २६ कर्मचारी कामावर परतले होते. रविवारीही हे कर्मचारी कामावर हजर होते. राजापुरात केवळ चार कर्मचारी कामावर हजर आहेत. राजापूर वगळता अन्य कोणत्याही आगारातून एकही एसटी फेरी सोडण्यात आली नाही. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर एसटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन करत आहे. रत्नागिरीतूनही काही कर्मचारी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झाले आहेत.