रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात झालेला र्हास (लर्निंग लॉस) तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण शुक्रवारी (ता. 13) झाले. यामध्ये जिल्ह्यातील तिसरी, पाचवी, आठवी व दहावीतील 4 हजार 952 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अध्ययन निष्पत्तीवर आधारित जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्यही या सर्वेक्षणातून मोजले जाणार आहे.
सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील 207 शाळांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीवर आधारित संपादणूक चाचणी व मुलाखत तसेच शिक्षक व मुख्याध्यापक मुलाखत अशा स्वरूपात हे सर्वेक्षण अतिशय उत्साहात आणि पारदर्शी पद्धतीने झाले. जिल्हा नोडल अधिकारी म्हणून डाएट प्राचार्य डॉ. गजानन पाटील, श्रीमती माधुरी शंकर, डॉ. संदिप पवार यांची जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले. या सर्वेक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी 248 निरीक्षक आणि 298 क्षेत्रीय अन्वेषक नेमण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी डायट प्राचार्यांसमवेत चिपळूण तालुक्यातील निवडक शाळांना भेटी देऊन सर्वेक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यापुर्वीही केंद्रस्तरावरुन अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते.