संपाचा पाचवा दिवस; रिक्षा संघटनांचा संपाला पाठींबा
रत्नागिरी:- एसटीचे शासनातील विलनीकरणाविरोधात पुकारलेला संप पाचवा दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी (ता. 12) राजापूर आगारातून दिवसभरात दोन फेर्या सोडण्यात आल्या होत्या; मात्र जिल्ह्यातील उर्वरित सर्वच्या सर्व फेर्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एसटी चालकांच्या संपाला मान्यता प्राप्त रिक्षा संघटनांनी पाठींबा जाहीर केला आहे.
अखंड महाराष्ट्रभर सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांचा संप सलग सुरुच राहिल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील 27 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर संपातून कर्मचारी माघार घेतली असा अंदाज होता; मात्र शुक्रवारी राजापूरमधून हातदे आणि बुरंबेवाडीला सोडण्यात आलेल्या दोन फेर्या वगळता जिल्हा भरात एकही फेरी गाडी रस्त्यावरुन धावलेली नाही. कर्मचारी एकजुटीमुळे प्रशासनही हतबल झालेले आहे. शासनाच्या आदेशानुसार वडापने प्रवासी वाहतूक सुरु असली तरीही ती अपुरी पडत आहे. रत्नागिरी वगळता अन्य काही जिल्ह्यांमध्ये वडापची वाहतूक करणार्या गाड्या एसटी बसस्थानकातून सोडण्यात येत आहेत; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात असा कुठेही प्रयोग झालेला नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे एसटी बसस्थानकं ओस पडली असून प्रवाशांना विविध थांब्यांवर खासगी गाड्यांची वाट पहात रहावे लागत आहे. जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने संप सुरु असून विभागिय कार्यालयासह तालुक्यांच्या ठिकाणी कर्मचारी दिवस-रात्र बैठक मांडून आंदोलन करत आहेत.
एसटी कर्मचार्यांच्या संपाला रत्नागिरी जिल्ह्यातील मान्यताप्राप्त रिक्षा संघटनांनीही पाठींबा जाहीर केला आहे. शुक्रवारी सकाळी रत्नागिरी विभागिय कार्यालयासमोरील आंदोलनाच्या ठिकाणी रिक्षा संघटना पदाधिकार्यांनी एसटी कर्मचारी कर्मचार्यांची भेट घेतली. यावेळी रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर, राजेंद्र घाग, संतोष सातोसे, लहू कांबळे, दिलीप खेतले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. खेतले म्हणाले की, एसटी कर्मचारी कुटूंबियांसह आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या व्यथा सरकारने समजून घेतल्या पाहिजेत. रिक्षा संघटना प्रतिनिधी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना रत्नागिरीतुन विनंती करतो. रस्त्यावर उतरलेली ही माणसच आहेत आणि तीही मराठी आहेत. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा. एसटी चालली तर रिक्षा व्यावसाय चालणार आहे. एसटीवर रिक्षावाल्यांचे पोट भरते. गेल्या पाच दिवसात रिक्षावाल्याची अवस्था बिकट झाली आहे. दुसर्याला दयायचं असते, तेव्हा समिती स्थापन केली जाते. एसटीचे प्रश्न सोडवले तर रिक्षावाले निवडणुकीत तुम्हालाच मतदान करतील. अन्यथा रिक्षावले उपोषणाला बसतील.