…अन्यथा 15 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन
रत्नागिरी:-अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि एक स्टाफ नर्सेसना निलंबित करण्यात आले आहे, तर यामध्ये दोन नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील
महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने काळया फिती लावून काम सुरू केले आहे.दरम्यान संबंधितांवरील कारवाई मागे न घेतल्यास 15 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
06 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला . सदर घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेली आहे , अशी समस्त वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धारणा आहे . परंतु , सदर प्रकरणाची कुठलीही चौकशी न करता , कार्यरत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारीका यांना दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी अटक करण्यात आली . वास्तविक , रुग्णालयांच्या ठिकाणी फायर ऑडिट करून घेणे आणि त्यातील आक्षेप,त्रुटींच्या अनुषंगाने अनुपालन करून घेणे , हे वैद्यकीय अधिकारी आणि शुश्रुषा संवर्गाचे काम नाही . तरीदेखील , वरील प्रकरणात आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर हेतुपुरस्सरपणे ही बाब दुर्लक्षित करण्यात आली . कक्षातील कार्यरत अधिपरिचारीका व कर्मचारी यांनी तेथून पळ न काढता , रुग्णांचा जीव वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला , असे प्रत्यक्षदर्शी रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील कबुली दिलेली आहे . असे असूनही , अन्यायकारक रीतीने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन , सेवासमाप्ती व अटक करण्यात आली आहे . या संपूर्ण घटनेचा आम्ही वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारीका संघटनेकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत.अन्यथा 11 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, महिला रुग्णालय ,ग्रामीण व उप जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका काम बंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. दरम्यान संघटनेच्या राज्य स्तरावरील आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध म्हणून काळया फिती लावून काम सुरू केले आहे.परंतु 14 नोव्हेंबर पर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे न घेतल्यास 15 नोव्हेंबर पासून काम बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.