रत्नागिरी:- जयगड येथील बेपत्ता नवेद 2 या मच्छीमारी नौकेला मालवाहतूक करणार्या जहाजाची धडक बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे; त्यानुसार पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरु झाला आहे. पण बंदरामध्ये येणार्या मालवाहून जहाजाकडून संदेश मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेने चार नॉटीकल मैल अंतरावर जाऊन तपासणी केली, तेव्हा काहीच आढळले नसल्याचे पुढे येत आहे.
जयगड येथील नवेद 2 ही नौका बेपत्ता झाल्याच्या घटनेला दहा दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे; परंतु त्याचा शोध लागलेला नाही. एक मृतदेह वगळता अन्य काहीच हाती न लागल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नवेद या नौकेला मालवाहू जहाजाची धडक बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पण चार नॉटीकल मैल अंतरावर काहीतरी समुद्रात दिसल्याचा संदेश याच जहाजावरुन प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून घटनास्थळाच्या परिसरात पाहणी करण्यात आली. किनार्यापासून जहाजाकडून सांगितलेला भाग जवळच असल्याने काही मच्छीमारांकडूनही चाचपणी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावेळी अपघात झाल्याचे पाण्यामध्ये काहीच दिसून आले नव्हते. त्या जहाजाचे अवशेषही मिळालेले नसल्याने नवेद 2 नौका बेपत्ता कशी झाली, याबाबतचे गुढ वाढत चाललले आहे. जयगड पोलिस याचा कसुन तपास करत आहेत. मच्छीमारांनी व्यक्त केलेल्या संशयाचाही शहनिशा केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने त्यावर कसा तोडगा काढला जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मच्छीमारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.