लांबलेल्या पावसाने भात पिकाची वाताहत; भाताच्या फुलोऱ्यावर पावसाचा प्रभाव 

रत्नागिरी:- यंदा खरीप हंगामात समाधानकारक झालेला पाऊस भात, नागली पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरली आहे; मात्र अखेरच्या टप्प्यात पडलेल्या मुसळधार पावसासामुळे भाताच्या लोंबीत ‘दाणा’च नसल्याची (चिम) स्थिती रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी आढळून आली आहे. पीक तयार होण्याच्या काळात भाताच्या फुलोर्‍यावर पावसाचा प्रभाव झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

यंदा खरीप हंगामात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे मान्सूनच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात यंदा खंड पडू दिला नव्हता. शेतीचीही कामे अगदी वेळेत सुरू झाली. जुलै महिन्यात अतिमुसळधार पावसामुळे नदी किनारी भागातील भातशेतीला मोठा फटका बसला. मात्र अन्य तालुक्यांमध्ये स्थिती समाधानकारक होती. यावर्षी तुलनेत भातपिकावर किड रोगांचा प्रादुर्भाव कमी होता. जिल्ह्यात 482 गावांतील 6,637 शेतकर्‍यांचे 1 हजार 364.33 हेक्टरपेक्षा अधिक पिकक्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या भात शेतीची कापणी वेगात सुरु आहे. सुमारे 45 ते 50 टक्के भातकापणी पूर्णत्वास गेल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे. या हंगामात पर्जन्यमान चांगले राहिले, भातरोपेही चांगली पोसली. पण भाताला फुलोरा येण्याच्या काळात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादनावर परिणाम झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे येथे काही शेतकर्‍यांनी याबाबत माहिती दिली. भाताला लोंब आली, पण त्यात दाणे अल्प तर उर्वरित ‘चिम’ अशी अवस्था पाहून शेतकरी गळीतगात्र झाले आहेत. संकरित बियाण्यांमध्ये काहीतरी गोंधळ असल्याची शंका शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. अलिकडे भाताचे जास्तीत-जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी संकरित, प्रमाणित बियाण्यांचा मोठा वापर करत आहेत.