४० हजार ५०० रुपये दंड
रत्नागिरी:- पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला येथील विशेष पॉस्को न्यायालयाने २० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा व ४० हजार ५०० रुपये दंड ठोठावला. इकबाल इस्माईल मोनये (वय ३८, रा. तळगाव, काझीवाडी, ता. राजापूर) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालवधीत घडली होती. पिडीत मुलगी ही मोल मजूरी करणारी होती. आरोपी इकबाल मोनये यांची दोन वर्षापुर्वी मुलीशी ओळख झाली होती. मोनये मशीदीजवळ रुममध्ये रहात होता. २३ जानेवारीला त्याने रुम शेणाने सारवण्यासाठी बोलवले होते. ते रहात असलेली पडवी शेणाने सारवल्यानंतर इकबाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर ठार मारुन टाकीन अशी धमकी पिडीत मुलीला दिली. त्यानंतर १४ फेंब्रुवारीला पिडीत मुलीची आई दातांच्या डॉक्टरकडे राजापूरला आली होती. आई दुपारनंतर परत आली नाही म्हणून तिच्या आजोबांनी आईला फोन करण्यास सांगितले. आजोबांच्या मोबाईलला रेन्ज नसल्यामुळे आरोपी इकबालच्या मोबाईलवरुन आईला फोन लाव असे सांगितले. इकबालच्या मोबाईलवरुन आईला फोन झाल्यानंतर आईने येत असल्याचे सांगितले. त्यानंतर इकबालने पुन्हा जबरदस्तीकरुन अत्याचार केला. त्यानंतर तब्बेत ठिक नसल्यामुळे राजापूर येथे आईने डॉक्टरकडे नेले त्यावेळी पिडीत मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचे पुढे आले. तेथील डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात खबर देण्याचे सांगितले. ५ जूनला राजापूर पोलिस ठाण्यात पिडीतेने तक्रार दिली.
तक्रारीवरून पोलिसांनी ६ जूनला आरोपी विरुद्ध भादवी कलम ३७६, ५०६ व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम २०१२ (४) व (६) अन्वये गुन्हा दाखल केला. तपास राजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. एल. मौले करत होते. तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. बुधवारी (ता. २७)ला या खटल्याचा निकाल विशेष पॉस्को न्यायालयात झाला.
सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये १० सरकारी कर्मचारी, अधिकारी डॉक्टर आदींचा समावेश होता. या खटल्यात चक्क फिर्यादीसह तीची आई फितूर झाली होती. मात्र विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य झाला. न्यायालयाने इकबाल मोनये याला ३७६, ५०६ व पॉस्को अंतर्गत दोषी ठरवून २० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा व ४० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल किरण सपकाळे व मदतनीस म्हणून अनंत भिकाजी जाधव यांनी काम पाहिले.