जिल्ह्यातील जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार थंडावले

रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी सजा आणि मंडलाधिकारी कार्यालयातील संगणकीकृत कामकाज बंद आहे. गेल्या 10 दिवसापासून संगणकीकृत सातबारा उतारे, फेरफार पत्रक वितरण, फेरफार नोंदी प्रमाणीकरण आदी ऑनलाईन स्वरूपाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे जमिनीसंदर्भातील व्यवहार थंडावले आहेत.

जमाबंदी आयुक्त कार्यालयातील राज्य समन्वयक यांची बदली होण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने 11 ऑक्टोबरपासून संगणकीकृत कामकाज बंद आंदोलनाची हाक दिली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने या आंदोलनाला पाठिंबा देऊन ऑनलाईन कामकाज बंद ठेवले आहे.

सजा आणि मंडलाधिकारी कार्यालयात अशा कामासाठी येणार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सजा आणि मंडलाधिकारी कार्यालयाजवळ या संदर्भात निवेदन चिटकवण्यात आले आहेत. राज्य समन्वयक यांनी अपमानास्पद मेसेज पाठवून सर्व तलाठी, मंडलाधिकारी, तलाठी संवर्गातील अव्वल कारकून, नायब तहसीलदार यांचा अवमान झाला आहे. यामुळे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य करून घेण्यासाठी ऑनलाईन कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.