कोरोनातील तोटा भरून काढण्यास होणार मदत
रत्नागिरी:- कोकण रेल्वेला मंगळुरू बंदरातून नव्याने कोळसा वाहतूकीचे कंत्राट मिळाली असून आणि बल्ली कंटेनर डेपोमधून निर्यात कंटेनर ऑपरेशन सुरू झाले. अंकोला आणि सूरथकल दरम्यान नवीन रोल ऑन – रोल ऑफ (रो -रो) सेवा सुरू झाली आहे. या प्रकल्पांमुळे कोरोना काळात तोट्यात गेलेल्या कोकण रेल्वे महामंडळाला फायदा होणार असल्याचे कोरे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वेचा 31 वर्षांचा प्रवास नुकताच पूर्ण झाला आहे. कोरोनाच्या नियमांचा विचार करून कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. उच्च दर्जाचा प्रवास केल्याचे समाधान मिळावे यासाठी कोकण रेल्वेने सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोविडचा सामना करण्यासाठी टाळेबंदीनंतर (लॉकडाऊन) मार्च 2020 मध्ये सर्व प्रवासी गाड्यांचा प्रवास थांबवला होता. टाळेबंदीचे निर्बंध हळूहळू कमी केल्यानंतर भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेसह टप्प्याटप्प्याने सेवा सुरू केली. सध्या कोकण रेल्वे मार्गावर सर्वमिळून 42 फेर्या आणि पॅसेंजर ट्रेनच्या 5 फेर्या सुरु आहेत. गणेशोत्सवात 256 विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत.
गतवर्षी वर्षी कोकण रेल्वेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 8 नवीन क्रॉसिंग स्टेशन आणि 8 लूपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. रोहा – वीर विभागाचे ट्रॅक दुहेरीकरण पूर्ण करण्यात यश आले. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात असून ते डिसेंबर 2021 पर्यंत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मडगाव जंक्शन दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सुरू झाला. नेपाळ रेल्वेने जयनगर-कुर्था ते कोकण रेल्वे दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्याचे काम सोपवले असून कोकण रेल्वेचा हा पहिला आंतरराष्ट्रीय ऑपरेशनल आणि व्यावसायिक प्रकल्प आहे. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत विचार सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत 90 टक्केपेक्षा अधिक कर्मचार्यांना कोविड लसीचा पहिला डोस तर 70 टक्के कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 21 जुलैच्या अतिवृष्टीत चिपळूण परिसरात अडकलेल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून पाणी, अन्न आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेची प्रगती आणि वाढीत योगदान दिलेले अधिकारी आणि कर्मचार्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रे देण्यात आला. यूएसबीआरएल प्रकल्पांतर्गत चिनाब पुलाची कमान यावर्षी 5 एप्रिल रोजी पूर्ण झाली. कोकण रेल्वेचे हे एक मोठे तांत्रिक यश आहे. प्रतिष्ठित चिनाब पूल नदीच्या पात्रातून 359 मीटर वर आहे आणि शक्तिशाली चिनाब नदीच्या पलीकडे 467 मीटर एकच कमान आहे. चिनाब पुलाची एकूण लांबी 1315 मी आहे, ज्यामध्ये 17 स्पॅन आहेत, ज्यामध्ये चिनाब नदीच्या मुख्य कमान भागातील एक स्पॅन 467 मीटर लांबीचा आहे.