शहरातील साडेसहा हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाचे आव्हान

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि दहशत मोडीत काढण्यासाठी अज्ञातांनी विषप्रयोग करून एका रात्रीत २१ कुत्र्यांना मारल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. शहरातील सुमारे दोन ते अडीच हजार कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात आले आहे. मात्र अजूनही साडे सहा हजार कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. त्यासाठी पालिकेने निर्बिजिकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. अजूनही सुमारे ३ हजार कुत्र्या नजीकच्या काळात पिल्ले घालणार असा अंदाज यावर अभ्यास केलेल्या काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बांधला आहे. 

दरम्यान, त्या २१ कुत्र्यांना मारण्यासाठी अज्ञातांनी फोरेट पावडरीचा वापर केल्याचा अंदाज आहे. शहरामध्ये उनाड कुत्र्याची संख्या दिवसेंदवस वाढत चालली आहे. कुत्र्यांचे कळप अनेक ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांना किंवा मुलांना काही नाक्यांवरून किंवा आळीतून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. ही कुत्री पाठलागही करतात. त्यामुळे शहरामध्ये कुत्र्यांची प्रचंड दहशत वाढली आहे. मांडवीत अशाच प्रकारे कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पालिकेने कुत्र्यांचे निर्बिजिकरण आणि रेबिज इंजक्शन देऊन लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली. गेली तिन वर्षे पालिका कोल्हापूर आणि इतर ठिकाणच्या संस्थेला ठेका देऊन हे निर्बिजिकरण करण्यात आले. त्यासाठी सुमारे ४५ ते ५० लाखाच्यावर पालिकेने निधी खर्च केला आहे. यातून दोन ते अडिच हजार कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात आले. मात्र तरी कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने ही मोहीम पालिकेने थांबविली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अज्ञातांनी कुत्र्यांना विषारी औषध घालून मारल्याचा प्रकार पुढे आला. 

याबाबत येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भागवत म्हणाले, कुत्र्यांना विष घालून मारणे हा कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा उपाय असु शकत नाही, ही क्रुरता आहे. शहरामध्ये अजूनही सहा ते सात हजार कुत्र्यांचे निर्बिजिकरण करणे आवश्यक आहे.पालिकेने काही कर्मचाऱ्याना कुत्रे पकडण्याचे ट्रेनिंग दिले पाहिजे.त्यात पशुवैद्यकीय अधिकारी असला की, पालिकेची निर्बिजिकरणाची स्वतंत्र टिम तयार होईल.