दुचाकी चोरीप्रकरणी तरुणाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

रत्नागिरी:- घराबाहेर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी 1 वर्षांची शिक्षा झालेल्या तरुणाला दुचाकी चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्यात 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. चोरीची घटना 13 जानेवारी 2021 रोजी घडली होती.

शहरातील उद्यमनगर लेप्रसी वसाहतीत राहणारे  संतोष विष्णु मोहिते (वय 32 व्यवसाय सेंन्ट्रींग काम) हे त्यांचा भाऊ समीर विष्णू मोहिते यांच्या नावे असलेली दुचाकी आपल्या दैनंदीन कामाकरीता वापरत होते . दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी ते दैनंदिन कामकाज उरकून घरी आले. सायंकाळी त्यांचा आत्ते भाऊ प्रथमेश राजेंद्र लोहार याने संतोष वापरत असलेली दुचाकी आपल्या कामासाठी नेली होती. मित्राकडील काम उरकून प्रथमेश रात्री 11.00 वाचे सुमारास  दुचाकी घेवुन घरी आला.ती दुचाकी त्याने घराचे शेजारी पार्क करुन ठेवली होती परंतु दुचाकीचे हॅन्डल लॉक न करता गाडीची चाँवी घरात आणुन दिली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष हे कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना बाहेर दुचाकी दिसून आली नाही. आपली दुचाकी चोरीला गेल्याची खात्री झाल्याने त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.  या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वी.क 379 अन्वये गुन्हा दाखल केला होता. 

दुचाकी चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी हेमंत देसाई  याला अटक केली होती. त्याच्या विरोधात येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी झाली. दुचाकी चोरी प्रकरणी न्यायालयाने हेमंत देसाई  याला 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने प्रज्ञा तिवरेकर यांनी तर   पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनाली शिंदे पोलीस नाईक वर्षा चव्हाण व त्याना विशेष सहाय्य पोहेकॉ दुर्वास सावंत यांनी केले.