खेड:- मुंबई-गोवा महामार्गवरील खवटीनजीकच्या विन्हेरे फाटा येथे भरधाव वेगातील क्रूझर ट्रॅक्सचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला. पंकज भगवान घाडगे (39) असे त्याचे नाव असून तो दापोली येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दापोली येथील आठजण क्रूझर ट्रॅकसने सातारा जिल्ह्यातील फत्तेपुर येथे जायला निघाला होते. त्यांची क्रूझर रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील विन्हेरे फाटा येथे आली असता क्रूझरचा पुढचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात ती क्रूझर रस्त्याच्या कडेला कलंडली. अपघाचे वृत्त कळताच खेडचे सपोनि सुजित गडदे, कशेडी वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अजित चांदणे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाना पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या पंकज घाडगे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.