रत्नागिरी:- गेली सात वर्षे रखडलेल्या येथील रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न सुटला आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ९ कोटीच्या तांत्रिक मंजुरीचे आदेश बांधकाम विभागाने दिले असून लवकरच पंचायत समितीच्या इमारतीचे काम सुरू होणार आहे.
रत्नागिरी पंचायत समितीच्या हक्काच्या इमारतीचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पंचायत समितीची इमारत होती. ब्रिटिशकालीन ही इमारत वापरण्यास धोकादायक झाली. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कारभार करणे शक्य नसल्याने रत्नागिरी पंचायत समितीचे कार्यालय स्थलांतरीत केले. जिल्हा परिषदेच्या आवारातील डीआरडीएच्या नव्या इमारतीमध्ये रत्नागिरी पंचायत समितीचे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात हलविले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुनी इमारत निर्लेखित करून नव्या इमारतीचा प्रस्ताव करण्यात अनेक अडचणी आल्या. तत्कालीन सभापती प्रकाश साळवी यांच्यासह महेश उर्फ बाबू म्हाप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचायत समितीच्या जागेसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली.
पंचायत समितीच्या इमारतीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली. इमारतीसाठी १ कोटी ७१ लाखाचा निधी होता. परंतु जागेचा सातबारा रत्नागिरी पंचायत समितीच्या नावावर नसल्याने निधी खर्ची टाकण्यात यश आले नाही. यात दोन वर्षांचा कालावधी गेल्याने इमारतीसाठी ३ कोटी २७ लाखांचा फेरप्रस्ताव तयार केला. जागेचा प्रश्न निकाली न निघाल्याने पंचायत समितीच्या इमारतीसाठी आलेला निधी ३४ लाख १४ हजार देवरूख पंचायत समितीच्या इमारतीसाठी वर्ग केला. या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील १६.९५ गुंठे जागा रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीसाठी देण्याचा निर्णय झाला. अल्पबचत कार्यालयासमोरील जागा देण्यात आली. प्रत्यक्षात पंचायत समितीला असलेल्या अधिकाराच्या अडीच पट आराखडा झाल्याने या प्रस्तावातही त्रुटी काढण्यात आली. पंचायत समिती नवीन इमारत बांधकामासाठी ९ कोटी अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या २ दिवसात ९० लाख निधी या कामासाठी मिळणार आहे.