मित्राकडून 2 लाख 86 हजारांची फसवणूक; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- उद्योग- धंद्यासाठी घेतलेले 2 लाख 86 हजार रुपये परत न करता मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सन 2013 ते 2020 या कालावधीत घडली आहे.जनक नविनचंद्र पटेल (रा.जामनगर,गुजरात )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्याविरोधात संभाजी हरिभाऊ शिंदे (40,रा. तांबटआळी, रत्नागिरी ) यांनी शनिवार 18 सप्टेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार,जनक पटेल याने संभाजी शिंदे यांच्या मैत्रीचा फायदा घेत उद्योग- धंद्यासाठी वेळोवेळी आणि वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यास सांगितले. दरम्यान, संभाजी यांनी त्याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली असता पटेलने खोटे चेकचे फोटो पाठवून त्यांची फसवणूक केली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.