दरडग्रस्तांच्या नशिबी उपेक्षाच; प्रतिबंधात्मक उपाय आखण्यासाठी एकही रुपया नाही

रत्नागिरी:- जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीमध्ये पोसरे (ता. खेड) येथे दरड कोसळून सतरा जणांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यात 109 ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले. पुण्याच्या भुवैज्ञानिक विभागाकडून याचे सर्व्हेक्षणही होणार आहे. अनेक वाड्या यामध्ये बाधित होण्याची शक्यता आहे. अशी गंभीर परिस्थिती असतानाही राज्य शासनाकडून दरड प्रवण भागांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला एकही रुपयांचा तरतूद केलेली नाही. शेजारील रायगड आणि सिंधुदुर्गला मात्र निधी मंजूर केला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी राज्य शासनाकडून 3700 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे, भुमिगत विद्युत वाहिन्या, चक्रीवादळ निवारा केंद्र, पूर्व सुचना प्रणाली, वीज अटकाव यंत्रणा आणि दरड प्रवण भागांना प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तरतूद केली आहे. पुढील चार वर्षात यावर निधी खर्ची केला जाणार असून रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे 913 कोटीचा निधी ठेवण्यात आला आहे. दरड प्रवण भागांतील उपाय योजनांसाठी 71 लाख 10 हजाराची तरतूद असून त्यात रायगड आणि सिंधुदुर्गला निधी दिला आहे. पण रत्नागिरी जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. खेड, चिपळूणसह संगमेश्‍वर, राजापूर, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यात 109 ठिकाणी दरडी कोसळल्या. तिवडी गावामध्ये दोन वाड्यांच्या मध्ये डोंगर कोसळला होता. सुदैवाने ग्रामस्थांचा जीव वाचला. संगमेश्‍वर तालुक्यात दख्खनमध्येही तिच परिस्थिती होती. खेड तालुक्यात आंबवली बाऊलवाडी, जामगे, साखरोली, शिराव शिंदेवाडीसह अनेक वाड्यात दरडी कोसळून रस्ते खचले आहेत. सह्याद्रीच्या खोर्‍यात समाविष्ट या गावांमध्ये दरडीपासून सुरक्षित उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. पोसरे येथे दरड कोसळून घरे गाडली गेली. भुवैज्ञानिक विभागाकडून या गावांचे सर्वेक्षण करण्यासाठीचा अहवालही जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेता भविष्यात उपाययोजनांसाठी तत्काळ निधीची गरज भासणार आहे; मात्र राज्य शासनाकडून जाहीर केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात दरड प्रवण भागात उपाययोजनांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला तरतूदच नाही.