रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोरेचा प्रवास गतिमान होणार आहे. गणेशोत्सव लक्षता घेऊन गेले आठवडाभर कोकण रेल्वे प्रशासनाकडून रुळ जोडण्याची कामे हाती घेतली होती. यासाठी काही काळ ब्लॉक घेण्यात आला होता; मात्र त्याचा फायदा आता या मार्गावर धावणार्या गाड्यांना होणार आहे.
दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्यामुळे कोकण रेल्वे येणार्या काळात अधिक गतिमान होणार आहे. गेल्या काही काळात या दृष्टीने जी पाऊले उचलली जात आहेत. त्यातील एक महत्वाचा टप्पा सोमवारी (ता. 29) पूर्ण झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे. दुपदरीकरणाच्या या कामावर 530 कोटी रुपये खर्च होणार आहेत. रोहा ते वीर दरम्यानचे अंतिम टप्यात आलेले काम गेले सात दिवस ब्लॉक घेत पूर्ण करण्यात आले. या आठ दिवसात रोहा ते वीर दरम्यानचे रुळ जोडण्यात आले. या दोन स्थानकादरम्यानचे 46.8 किलोमीटरचे काम आता पूर्ण झाले आहे. यासाठी कोकण रेल्वेचे अधिकारी, अभियंते आणि कामगार अहोरात्र मेहनत घेत होते. दुपदरीकरणाच्या कामांमुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे. अगदी अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवापासूनच मार्गावर या दुपदारीकरणाचे फायदे दिसू लागतील. गणेशोत्सवात जादा गाड्या धावणार असल्यामुळे दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर भर दिला गेला होता. भविष्यात टप्याटप्याने यापुढील दुपदारीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांचे काही तास वाचणार आहेत.