रत्नागिरी:- भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेत भाजप कार्यकर्त्यांच्या सोन्याच्या चैनी व पाकिटांवर डल्ला मारणाऱ्या संशयित चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जन आशिर्वाद यात्रेवर बारीक लक्ष ठेवत पोलिसांनी कणकवली येथून चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जन आशिर्वाद यात्रेत गर्दीचा फायदा उठवत सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. अत्यंत कडक असा बंदोबस्त व पोलीस फौजफाटा असताना चोरांनी तब्बल ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्या होत्या.
रत्नागिरीतून सुरु झालेली हि जन आशिर्वाद यात्रा पुढे लांजा, राजापूर, खारेपाटण करत कणकवलीत पोहचली. यातील काही ठिकाणी देखील काही लोकांची पाकिटे चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. याचा अर्थ असा कि या यात्रेतील गर्दीचा फायदा उठवत हे चोरटे देखील यात्रेच्या मार्गानुसार स्थलांतर करीत असल्याचा संशय होता.
रत्नागिरी पोलिसांच्या संदेशानुसार पुढील मार्गावरील पोलीस अधिक सतर्क झाले होते. अशातच कणकवली येथे यात्रा पोहचल्यावर संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच या संशयितासोबत असणारे त्याचे साथीदार पळून गेल्याची माहिती देखील मिळत आहे.