धक्कादायक; जिल्हा रुग्णालयातील मृत महिलेच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची गंभीर घटना घडली. याबाबत नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यास चोरीसंदर्भात तक्रार दिली आहे. मृताच्या हातातील बांगड्या चोरीस गेल्याचे तक्रातील म्हटंले आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र याची गंभीर दखल घेत तत्काळ सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा एका कंत्राटी कामगाराने या बांगड्या चोरल्याचे निदर्शनस आले.

चोरीचा दागिना मिळाला असून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सिव्हिल प्रशासनाने सांगितले. सुलोचना गुणाजी पाटील (वय ८६, रा. पाली) असे मृत महिलेचे नाव आहे. यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या मिळणेबाबत नात समीक्षा रामदास पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली.

घटना अशी, तालुक्यातील पाली येथील सुलोचना पाटील यांना नात समीक्षा पाटील यांनी 9 ऑगस्टला रात्री सव्वादहाच्या सुमारास शासकीय जिल्हा रुग्णालय येथे मृत झाल्याचे तिला मोबाईलवरून कळवण्यात आले. त्यानुसार त्यांचा अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यात आला. या अर्जात समिक्षा पाटील यांनी म्हटले आहे की, आजीला 1 ऑगस्टला कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे महिला कोविड रुग्णालय येथे वॉर्ड 5 मध्ये दाखल केले होते. मात्र दोन दिवसांनी ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्यांना वार्ड क्रमांक 9 मध्ये हालवण्यात आले. तिच्या उजव्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या. याबाबत त्यांनी स्मिता सावंत (स्टाफ) यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु त्यावेळी उजव्या हाताला इंजेक्शन देण्यासाठी फ्लो लावलेला असल्याने बांगड्या काढणे जमले नाही.

6 ऑगस्टला त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हलवण्यात आले. यादरम्यान समीक्षा यांनी दोन सोन्याच्या बांगड्या हातात न दिसल्यामुळे ताबडतोब इतर स्टाफच्या निदर्शनास आणून दिले. स्वतः त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना स्टाफकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. कोणीही जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हते. रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा गंभीर प्रकार होता.

या घटनेबाबत तक्रारी अर्जाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लक्ष घालून ही शहानिशा करण्याची तसेच या ठिकाणी कार्यरत असलेल्या स्टाफची सखोल चौकशी करावी व दोन सोन्याच्या बांगड्या दोन ते तीन दिवसात परत मिळवून द्यावेत, अशी विनंती केलेली आहे.रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतर कंत्राटी कामगारांने त्या बांगड्या चोरल्याचा निदर्शनास आले. त्यानंतर या बांगड्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. मात्र या चोरीबद्धल संबंधितावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.