15 ऑगस्टपासून शुभारंभ
रत्नागिरी:- पीक पाहणीसाठी ‘ई-पीक’ या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याद्वारे शेतकरी त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतील. त्यामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होईल. महसूल आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिले.
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या गठित केल्या आहेत. शेत जमिनीच्या उतार्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकर्यांना पीक कर्जही दिले जाते. त्यामुळे ही पीक पाहणी पध्दत अधिक अचुक व सोपी होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहयोगाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. शेतकर्यांनी अॅपव्दारे आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करायची आहे. 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान ई-पीक पाहणी प्रकल्प प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह असून त्यादरम्यान याबाबतीत क्षेत्रीयस्तरावरील अधिकार्यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, अॅप हस्तांतरण करण्यात येणार आहे. पीक पाहणी नोंदणीत शेतकर्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकर्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.
या अॅपच्या माध्यमातून शेतकर्याने स्वतःच्या फोटोसहीत एक वेळेस नोंदणी करावयाची आहे. नोंदणीनंतर शेतातील उभ्या पिकाची पीक निहाय, हंगाम निहाय व क्षेत्र निहाय पिकांची माहिती स्वयंम घोषणेद्वारे अॅप मध्ये समाविष्ट करावयाची. पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्त्रोताची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाउस, पॉली हाउस व विहीर पड, इमारत पड़ यासारख्या कायम पडची देखील नोंद करता येते. पिकाची अद्यावत व खरीखुरी माहिती नोंदविण्यासाठी शेतकर्याने स्वतः च्या शेतातील उभ्या पिकाचे छायाचित्र काढायचा आहे, जो अक्षांश, रेखांश, दिनांक आणि वेळ दर्शवेल.