रत्नागिरी:- महाड तालुक्यातील तळिये व खेडमधील पोसरे बौध्दवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेसारखी आणखी एक घटना चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे होता-होता वाचली. तिवरे गावठाण व गंगेचीवाडी या दोन वाड्यांच्या दरम्यान घडली. अगदी खाली आलेल्या डोंगराचा मलबा घरांना लागून पुढे सरकल्याने दोन वाड्या बचावल्या असल्या तरी येथील सत्तर ते ऐंशी कुटुंब भितीच्या छायेखाली वावरत आहेत.
महाड येथील तळिये व खेडमधील पोसरे येथे ज्या दिवशी घटना घडली. त्याच दिवशी तिवरे गावठाण व गंगेचीवाडी दरम्यान ही दरड कोसळून खाली आली. येथील ग्रामस्थांचे नशिब बलवत्तर म्हणून या दरडीखाली एकही घर आले नाही. मोठ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर, माती, दगड, गोठे, मोठी झाडेही खाली वाहत आली. 22 जुलै रोजी रात्री ही घटना घडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तिवरे गावठणमधून आलेली दरड पुढे गणपती विसर्जन घाटापर्यत गेली आहे. डोंगरालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्याने ग्रामस्थ रात्री जवळच्या गणपती मंदिरात झोपण्यासाठी गोळा होत आहेत. या ठिकाणी पन्नासहून अधिक कुटुंब वास्तव्याला आहे. दोन वाड्यांच्या मधून घरालगत ही दरड खाली आल्यामुळे कुणीही जखमी झाले नाही. नशिब बलवत्तर म्हणून बचावल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. गावठाण व परिसरातील संपूर्ण शेती या दरडी खाली गेली आहे. दोन वर्षापूर्वी तिवरे येथे धरण फुटल्याच्या धक्क्याखाली अजूनही येथील कुटुंब असून डोंगराची एक बाजूच खाली आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणखी भितीचे वातावरण तयार झाले आहे. तिवरे गावठाणकडे जाणारा रस्ताही चिखलाखाली गेला आहे.
जवळच्या रिक्टोली इंदापूर या वाडीलगतच्या डोंगरालाही भेगा गेल्या असून, येथील सत्तर ते ऐंशी कुटुंबियांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तिवडी या गावी जाणार्या रस्त्यावरील पूल तुटला असून रस्ताही वाहून गेल्याने येथील संपर्क तुटला आहे. दसपटीतील रामवरदायिनी मंदिरानजीक असणारा पूलही धोकादायक बनला आहे. गेल्या चार दिवसात प्रशासनाचा एकही माणूस न फिरकल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने घटनेची पाहणी केली. या ठिकाणी भूवैज्ञानिक जाऊन पाहणी करणार आहेत.