राजापूर, रत्नागिरी, दापोलीत दरड कोसळण्याच्या घटना
रत्नागिरी:-आषाढी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर, रत्नागिरी, दापोलीत दरड कोसळण्यासह भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या नद्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 102.72 मिमी तर एकूण 924.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 106.10 मिमी, दापोली 169.70 मिमी, खेड 140.30, गुहागर 132.40 मिमी, चिपळूण 128.00 मिमी, संगमेश्वर 69.30 मिमी, रत्नागिरी 66.90 मिमी, राजापूर 59.40 मिमी,लांजा 52.50 मिमी पाऊस झाला.
दापोली तालुक्यात हर्णे येथील विक्रांत अनंत मयेकर यांच्या गाडी पार्कींग मध्ये पाणी शिरल्याने गाडीचे 1 लाख 20 हजाराचे नुकसान. बुरोंडी येथील हाजिरा ईस्माईल बुरोडकर यांच्या घराचे अंशत: 15 हजार रुपयांचे नुकसान. ओननवसे-गुडघे-उंबरघर रस्ता खचला आहे. वाहतूक सुरु आहे. खेड तालुक्यात खेड येथील खेड-दापोली रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने सकाळी वाहतूक सुरळीत झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई- कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावर मध्यभागी अवजड दगड पडल्याने या मार्गावरील वाहतुकीत अडथळा आला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने हा दगड दुर करुन रस्ता वाहतूकीस सुलभ करावा अशी मागणी कुंभारखाणी बुद्रुक सरपंच सौ. दीपा सुर्वे यांनी केली आहे. संततधारेमुळे रस्त्यावर टेकडीवरून भलामोठा दगड घसरल्यामुळे जड वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. छोट्या गाड्या रस्त्याच्या बाजूने वळसा घालून जाताना बाजूस दरी असल्याने अपघात होऊ शकतो. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झालेली घनदाट झुडुपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्त्याची देखभाल करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी उपसरपंच अनिल सुर्वे, तंटामुक्त अध्यक्षा सौ. शलाका सुर्वे, माजी सैनिक राजेंद्र कदम, संजय साळवी यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे गेले आठवडाभर तालुक्यातील विविध ठिकठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडलेले असताना या आठवड्यामध्येही जमीन खचण्याच्या घटना कायम राहील्या आहेत. त्यामध्ये तारळ- चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील कॉजवे डोंगर येथे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, आज सकाळपासून पावसाचा जोर कायम राहील्याने पुन्हा एकदा अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येवून पूराच्या पाण्याने दुपारनंतर जवाहरचौकामध्ये धडक दिली. त्यामुळे ‘नद्यांचा पूर आणि राजापूर’ याचे समिकरण सलग दुसर्या आठवड्यामध्ये कायम राहीले आहे.