जिल्ह्यात दीड महिन्यातच 50 टक्के पावसाची नोंद 

1 हजार 808 मिलीमीटर पाऊस, गतवर्षीच्या तुलनेत 600 मिमी अधिक पाऊस

रत्नागिरी:- दिड महिन्यात जिल्ह्यात १ हजार ८०८ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकुण पावसाच्या पन्नास टक्के नोंद झाल्यामुळे यंदा खरीप हंगामातील ८० टक्के भात लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ६०० मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे.

मे महिन्याच्या मध्यात तौक्ते चक्रीवादळ येऊन गेल्यामुळे मोसमी पावसाचा मार्ग मोकळा झाला. 1 जुनपासून पुर्व मोसमी पावसाला सुरवात झाली. त्यानंतर चारच दिवसांनी मोसमी पावसाचे आगमन झाले. यंदा भात पेरणीच्या कामांना वेळेत सुरवात झाली. १५ जुनपर्यंत शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. लागवडीसाठी आवश्यक भात रोपांसाठी साडेसहा हजार हेक्टरवर रोपवाटीका तयार केल्या जातात. पेरणी केल्यानंतर वीस ते बावीस दिवसात रोप लागवडीसाठी तयार होतात. ऐन लावणीच्या तोंडावर पावसाने दडी मारली. सुमारे आठ दिवस पावसाची एक सरही दिवसभरात पडत नव्हती. कडकडीत उन्हामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. रोपवाटीका वाचवण्यासाठी पाणी आणण्याचे आवाहन होते. कातळावरील सुमारे दहा हजार हेक्टरवरील भातशेती वाचेल की नाही अशी स्थिती होती; परंतु जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे दणक्यात पुनरागमन झाले. गेले दहा दिवस संततधार पाऊस सुरुच होता. जुन महिन्यात मासिक सरासरी भरुन काढली असली तरीही लावणीसाठी आवश्यक पाणी नव्हते. गेल्या आठ दिवसातील समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांनी भात लावणीची कामे आटपून घेतली आहेत. नदी किनार्‍यावरील शेतीची कामे पावसाने विश्रांती घेतली तेव्हाच पूर्ण झाली होती. सध्या नद्यांना पूर येत असल्यामुळे किनारी भागातील शेतात दोन ते तिन दिवस पाणी साचून राहत आहे. त्यामुळे तेथील शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पावसाचा जोर असाच राहील असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे भातशेतीची कामे येत्या आठ दिवसात पूर्ण होतील असा अंदाज आहे. नागली पिकांमध्ये नाचणीची लावणी मुसळधार पावसामुळे पुढे गेली आहे. जिल्ह्यात ९ हजार हेक्टरवर नाचणी लागवड केली जाते.