रत्नागिरी:-शहरातील झाडगाव-परटवणे रोड दरम्यान शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला. हि कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी केली. या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
शहरातील झाडगाव-परटवणे रोड दरम्यान नदी किनारी एक तरुण गांजा विक्री करत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली होती. या माहितीवरून या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली होती.मिळालेल्या माहितीतीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेऊन झाडगाव-परटवणे परिसरात सापळा रचला होता. शहर पोलिसांचे एक पथक साध्या वेषात या परिसरात होते.
गांजा विक्री होत असल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता गांज्याच्या ५ पुड्या एका तरुणाकडे मिळून आल्या. या गांज्याची किंमत दहा हजार एकशे वीस रुपये असून पोलिसांनी गणेश पांडुरंग वाडेकर (वय वर्षे 40, राहणार शिवाजी हायस्कूल जवळ) या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान हि कारवाई शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गणेश सावंत व रत्नकांत शिंदे यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून आपल्या परिसरात गांजा विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने येथील रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत.