कोरोनातही वाहन खरेदी जोमात; दोन महिन्यात 852 वाहनांची खरेदी 

रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे मंदावलेल्या वाहन खरेदी गेल्या दोन महिन्यांमध्ये चांगलीच गती मिळाली आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मे आणि जून महिन्यामध्ये ८५२ वाहनांची खरेदी झाल्याची नोंद झाली आहे. यातून अनलॉक प्रक्रियामध्ये कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. वैयक्तिक हौसेसाठी दुचाकी आणि आलिशान चारचाकी कार खरेदीला वाहनधारकांनी अधिक पसंती दिली आहे. 

कोरोना महामारीने मार्च २०२० पासून देश, राज्य आणि जिल्ह्यात धुमाकूळ घातला. महामारीच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. या टाळेबंदीत सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला. दळणवळण, रोजगार, नोकरी, व्यवसाय, व्यापार आदीला ब्रेक लागला. यामध्ये वाहन खरेदी व्यवसाय देखील अपवाद नाही. कोट्यवधीची आर्थिक उलाढाली ठप्प झाली. देशाची आर्थिक परिस्थिती यामुळे अडचणीत आली.

राज्यात दुसरी लाट  थोपविण्यासाठी एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा टाळेबंदीसारखा कटू निर्णय शासनाला घ्यावा लागला. इतर क्षेत्राप्रमाणे वाहन खरेदी व्यवसायालाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला होता. यामध्ये नगण्य वाहन खरेदी होत होती. परंतु त्याला अपेक्षित तेजी मिळत नव्हती. दुसऱ्या लाटेतील अनलॉक प्रक्रियेमुळे मंदावलेल्या वाहन खरेदी व्यवसायाने चांगलीच गती पकडली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात ८५२ वाहनांची खरेदी झाली आहे. व्यावसायिक वाहनांची कमी खरेदी आहे; मात्र वैयक्तिक हौसेसाठी दुचाकी आणि चारचाकी आलिशान गाड्यांची खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात मे मध्ये ३२१ वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये ॲम्ब्युलन्स २, बस २, क्रेन १, डंपर १, गुडस् कॅरिअर वाहने ३२, दुचाकी १६३, मोटार कॅब १, मोटार कार ९६, थ्री व्हीलर (गुडस्) १, थ्री व्हीलर (प्रवासी वाहतूक) २२, एकूण ३२१ वाहनांची खरेदी झाली.

जून २०२१ मध्ये सुमारे ५३१ वाहनांची खरेदी करण्यात आली. यामध्ये ॲडॅप्टेड व्हेइकल (दिव्यांगासाठी वाहन )१, ॲम्ब्युलन्स ३१, बस १, डंपर ३, फोर्क रिफ्ड ४, गुडस् कॅरिअर वाहने २८, दुचाकी २७५, मोटार कार १७५, थ्री व्हीलर (गुडस्) ४, थ्री व्हीलर (प्रवासी वाहतूक) ९, एकूण ५३१ वाहनांची खरेदी झाली.