रत्नागिरी:- शहरालगतच्या कुवारबाव ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच असला तरी शिवसेनेचे बहुमत आहे. त्यामुळे भरमसाठ वाढलेली पाणीपट्टी त्यांच्याच मदतीने कमी होऊ शकते. युनिटला 4 ते 5 रुपये दरवाढ भाजपला मंजूर आहे. परंतू आता वाढलेली पाणीपट्टी 3 पट आहे. ती कमीत कमी 1200 रुपयांपर्यंत जाणार आहे. युनिटला 4 ते 5 रुपये वाढवले तर 150 ते 200 रुपयेच वाढणार आहेत. ही आमची मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांना घेवून टप्प्याटप्प्याने आंदोलने केली जाणार आहेत. तरीही बहुमतात असलेल्या शिवसेना सदस्यांनी दखल घेतली नाही तर पक्षाच्या अनुमतीनूसार सरपंच राजीनामा देण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते, असे भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत आणि कुवारबाव गाव विकास आघाडीचे समन्वयक सतेज नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुवारबाव ग्रामपंचायतीने जी प्रमाणाबाहेर पाणीपट्टी वाढवली आहे त्याला बहुमतात असलेले शिवसेना सदस्यच जबाबदार आहेत. ही पाणीट्टी कमी करून युनिटला 4 ते 5 रुपये वाढवून न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. 10 जुलै रोजी कुवारबाव ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले जाणार आहे. तरीही अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना सदस्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. उपसरपंच बबलू कोतवडेकर यांनी सरपंच आणि आघाडी समन्वयकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर पाणीपट्टी वाढ सर्वानुमते झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. या संदर्भात भाजपच्या सदस्यांकडून त्यांची बाजू मांडण्यात आली. जी 3 पट वाढ झाली आहे ती सहनशिलतेच्या पलीकडे आहे. ग्रामस्थांच्या या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत आहेत. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार आत्तापर्यंत 197 तक्रारी आल्याचेही जिल्हा उपाध्यक्षांनी सांगितले.
भाजपच्या सदस्यांनी झालेली दरवाढ कमी करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे या दरवाढीला कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होत आहे आणि उपसरपंच दिशाभूल करत आहेत हे ही उघड झाले आहे. कुवारबाव ग्रामपंचायत एमआयडीसीला जी काही 26 लाख रुपये थकीत रक्कम देणे आहे ती वर्षभरातच ग्रामस्थांकडून काढणे योग्य नाही,असेही भाजपच्या दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात आर्थिक झळ पोहचलेल्या कुटुंबांकडून अशाप्रकारे सुलतानी वसुली करणे असंवेदनशील आहे. त्यातच उपसरपंचांनी पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्यही निषेधार्थ आहे. लोक 20 रुपये लिटर पाणी पितात. तेथे 1 हजार लिटरला 35 ते 40 रुपये द्यायला काय हरकत आहे, असे वक्तव्य उपसरपंच बबलू कोतवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केले होते. ही भूमिका कोरोना काळात आर्थिक अडचणीत आलेल्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचेही सावंत आणि नलावडे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजप नेते विजय सालीम, सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, सरपंच मंजिरी पाडाळकर, ग्रा. पं. सदस्य गणेश मांडवकर, अनुश्री आपटे, प्राजक्ता चाळके उपस्थित होते. लखन पावसकर हे सदस्यसुद्धा सोबत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.