रत्नागिरी तालुक्यातील चार गावात दररोज सरसकट कोरोना चाचण्या

रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर निर्णय 

रत्नागिरी:- दिवसाला शंभरहून अधिक कोरोनाबाधित सापडत असल्याने पॉझिटिव्हिटी दरही अधिक आहे. रत्नागिरी तालुका हॉटस्पॉट बनला असून, नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पाऊले ऊचलावी लागणार आहेत. त्यासाठी तालुका आरोग्य विभागाने चाचण्या वाढविण्यासाठी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज चार गावांमधील लोकांची सरसकट चाचणीचे नियोजन केले आहे.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर खाली आला असताना रत्नागिरी तालुक्याचा दर ११.२८ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असतानाही चाचण्यांचे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी सरसकट चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रत्येक तालुक्याला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वाधिक बाधित सापडणाऱ्‍या चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यांनी चाचण्यांची संख्या वाढविली; परंतु रत्नागिरी तालुका मागे पडला आहे.

सध्या तालुक्यात १ हजार ४३४ बाधित उपचाराखाली आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ९१३ जणं असून ५२३ शहरातील आहे. हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरातील गावातून आलेले सर्वाधिक ३४९ बाधित उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ चांदेराई आणि पावस केंद्रांचा क्रमांक लागतो. शहरी भागात झाडगाव परिसरातील २१० तर कोकणनगरमधील ३१४ बाधित उपचार घेत आहेत.

तालुक्यात आतापर्यंत १३ हजार ५४४ एकूण बाधित सापडले होते. यामध्ये ४ हजार ५७१ शहरामधील तर ८ हजार ९७३ ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत ११ हजार ६३९ जणं कोरोनामुक्त झाले. कोरोनाचे अधिक बाधित सापडल्यामुळे २ हजार ९१९ ठिकाणी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली होती. सध्या त्यातील ४५९ ठिकाणी प्रतिबंधित नियम लागू आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी ८१ हजार ५२९ जणांच्या तपासण्यात करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय भवनात ८७ तर बीएड् कॉलेजमध्ये १०१ जण उपचार घेत आहेत.