लॉकडाऊन उठवताच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली; 24 तासात 693 कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन उठवताच कोरोना बाधित रुग्णसंख्येने देखील उसळी घेतली आहे. मागील 24 तासात 693 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 471 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 222 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 42 हजार 952 इतकी झाली आहे. आज जिल्ह्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून 865 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या कडक लॉकडाउनच्या कालावधीत प्रत्येक दिवशी 500 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. लॉकडाऊन नंतर तर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली आहे. मागील 24 तासात 693 रुग्ण सापडले आहेत. एकूण 4 हजार 269 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 693 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज जिल्ह्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1 हजार 473 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.42% इतका आहे.

जिल्ह्यात गेल्या सोमवारी 395 तर मंगळवारी 655, बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590, शनिवारी 582, रविवारी 567 तर सोमवारी 429, मंगळवारी 567, बुधवारी 525, गुरुवारी 538 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. शुक्रवारी नव्याने 683 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 332 पैकी 471 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 937 पैकी 222 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज 865 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 36 हजार 985 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 86.10% आहे.