संग्रहालयरत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय संग्राहलय उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात महाराजांवरील दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तकेही वाचनालयात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिवराज्यभिषेक सोहळा हा शिवस्वराज्य दिन म्हणून प्रत्येक कॉलेज व विद्यापीठात साजरा करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
ऑनलाईन पत्रकार परिषदेत ना. सामंत यांनी घोषणा केली. आघाडी सरकारने शिवस्वराज्य दिन हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याबाबत मुहुर्तमेढ रोवली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अभ्यास करता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभे करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या संग्रहालयासाठी छत्रपती शिवरायांवर अभ्यास करणार्या पाच लेखकांची समिती पुस्तके व अन्य साहित्यासाठी नेमली जाणार आहे. रविवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने सर्व महाविद्यालये, विद्यापीठ, स्वायत्त विद्यापीठांमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
याचवेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचेही भूमिपूजन होणार आहे. तत्पूर्वी यावर्षीपासून हे उपकेंद्र बी.एड कॉलेजमध्ये सुरु केले जाणार आहे. रामटेक येथील कालीदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्रही यावर्षीपासून रत्नागिरीतील महिला विद्यालयाच्या नुतन इमारतीत सुरु होणार असून याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली.
कोकणातील मासेमारी, फलोत्पादन व अन्य विषयांवरील आधारीत व्यवसाय प्रशिक्षण कोर्स सुरु केले जाणार असून सेंट्रल ऑफ एक्सेलन्सचे मोठे सेंटर उभारले जाणार आहे. यासाठी 25 कोटीचा निधी तर इमारत उभारणीसाठी 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पॉलिटेक्निकच्या एक एकर जागेत ही इमारत उभारली जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.