कशेडी घाटात आराम बसवर कारवाई; एक प्रवासी कोरोना बाधित

खेड:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी 6 वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या 29 जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे.

जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लॉकडऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाऱ्यानाच दिनांक 2 रोजीपासून प्रवेश देण्यात येत आहे.

मात्र, गुरुवारी सकाळी 6 वाजता कशेडी घाटात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना खासगी आराम बस (एमएच 03, सिव्ही 3150) थांबवली असता चालकाकडे व प्रवाशांकडे कोणतीही परवानगी नव्हती.

पोलिसांनी चालकासह प्रवाशांची आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे महाड नाका येथील एस. टी. च्या मैदानात अँटिजन चाचणी केली. या बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी कोरोनाबाधित आढळला. या प्रवाशाला तातडीने शिवतेज संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य 28 जणांची तालुका प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे. या सर्व प्रवाशांची दिशाभूल करून त्यांना जिल्ह्याच्या हद्दीत घेऊन येणाऱ्या बसचालक व मालक यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया खेड पोलीस स्थानकात सुरू करण्यात आली आहे.