देवरुख, साडवलीत जाणवले भूकंपाचे धक्के

संगमेश्वर:- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वातवरणात बदल झाला आहे. दोन दिवस पावसाचा जोर होता. शुक्रवारी, शनिवारी चांगले ऊन पडले. मात्र आज (रविवार) सकाळी ९ वाजुन १० मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का विशेष करुन बिल्डींगमध्ये उंच ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना तात्काळ जाणवला. 

काही घरात भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भांड्यांच्या आवाजाने नागरीकांना भूकंप झाल्याची जाणीव झाली. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी तो नागरीकांना जाणवला. दरम्यान कोकणात काही दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे बरेच नुकसान झाले आहे. आज सकाळी अचानक साडवली, देवरुख परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाचे धक्के मात्र मोजता आलेले नाहीत. नागरिकांमधून सौम्य धक्के बसले असल्याचे सांगितले जात आहे.